July 23, 2026

ऑपरेशन सिंदूर-२ च्या चर्चेने संजय राऊत अस्वस्थ; पाकिस्तानप्रेमाचा मुखवटा पुन्हा उघडा – नवनाथ बन

0
WhatsApp Image 2026-05-31 at 12.59.37 PM

ऑपरेशन सिंदूर-२ संदर्भातील चर्चांनी राजकीय वातावरण तापले असताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भारतीय सैन्याच्या शौर्याबाबत सातत्याने शंका उपस्थित करणे आणि पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेणे हा संजय राऊत यांचा कायमस्वरूपी राजकीय अजेंडा बनला असल्याचा आरोप त्यांनी केला.

नवनाथ बन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऑपरेशन सिंदूर-२ ची चर्चा सुरू होताच संजय राऊत यांची अस्वस्थता पुन्हा एकदा समोर आली आहे. भारतीय सैन्य देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची बाजी लावत असताना त्यांच्यावर विश्वास दाखविण्याऐवजी राऊत सातत्याने सैन्याच्या कारवायांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. अशा प्रकारची भूमिका देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले.

बन म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर प्रभावी कारवाई करून देशाच्या माता-भगिनींच्या कुंकवाचा बदला घेतला. भारताच्या सार्वभौमत्वावर आणि नागरिकांच्या सुरक्षेवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना त्यांच्या भूमीत जाऊन दिलेले हे प्रत्युत्तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद होते. मात्र, या कारवाईचे स्वागत करण्याऐवजी संजय राऊत यांनी त्यावर शंका उपस्थित करण्याचे काम केले. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर देशवासीयांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

त्यांनी पुढे म्हटले की, पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांमुळे भारताने अनेक निरपराध नागरिक आणि जवान गमावले आहेत. अशा वेळी भारतीय सैन्याच्या कारवाईचे समर्थन करणे अपेक्षित असताना संजय राऊत मात्र पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे लाभ होईल अशा प्रकारची वक्तव्ये करताना दिसतात. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा बचाव करणे, भारताच्या लष्करी कारवायांवर संशय व्यक्त करणे आणि पाकिस्तानचे गुणगान करणे हा त्यांचा राजकीय उद्योग झाला आहे, अशी टीका बन यांनी केली.

भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते म्हणाले की, भारतीय सैन्य हे देशाच्या सुरक्षेचे मजबूत कवच आहे. सैन्याच्या शौर्याबाबत शंका उपस्थित करणे म्हणजे देशाच्या जवानांच्या मनोबलावर आघात करण्यासारखे आहे. राजकीय मतभेद असू शकतात, परंतु राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर सर्वांनी एकजूट दाखविणे आवश्यक आहे. दुर्दैवाने संजय राऊत यांची भूमिका याच्या अगदी विरुद्ध असल्याचे दिसून येत आहे.

नवनाथ बन यांनी असा दावा केला की, ऑपरेशन सिंदूर-२ संदर्भात सुरू असलेल्या चर्चांमुळे भारतविरोधी आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या शक्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय सैन्य आणि केंद्र सरकार देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही. देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या कोणत्याही शक्तीला कठोर उत्तर दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संजय राऊत यांनी देशहिताला प्राधान्य देऊन पाकिस्तानधार्जिणी वक्तव्ये टाळावीत आणि भारतीय सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहनही नवनाथ बन यांनी केले. भारतीय जवानांच्या शौर्याचा सन्मान करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असून राजकारणाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर एकसंघ भूमिका घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, नवनाथ बन यांच्या या टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत असून ऑपरेशन सिंदूर-२ आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजप आणि उद्धव ठाकरे गटामधील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed