भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली; चालकाचा मृत्यू

पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – भरधाव वेगातील दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात इतर दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. १७ मे) रोजी रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास भोसरी उड्डाणपुलावर घडली.
याप्रकरणी प्रसाद बाळू गायकवाड (वय २९, रा. वडगाव पाटोळ, ता. खेड, जि. पुणे) यांनी रविवारी (दि. १७ मे) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोटारसायकल चालक राहुल शंकर लगाडे (वय ३०, रा. खेड) याचे या अपघातात निधन झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेबारा वाजताच्‍या सुमारास फिर्यादी प्रसाद गायकवाड, त्यांचा मित्र दिनेश ओव्हाळ आणि राहुल लगाडे हे तिघेजण प्रसाद यांच्या दुचाकीवरून (एमएच १४ एमएक्स ६२७६) नाशिक फाटा, कासारवाडी येथे जात होते. राहुल हा दुचाकी चालवत होता. त्याने दुचाकी वेगात चालवून दुभाजकाला धडक दिली. या अपघातात फिर्यादी आणि त्यांचा मित्र दिनेश हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर राहुल याचा मृत्यू झाला आहे. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *