पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) – पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात शस्त्रबंदी आदेश लागू असताना बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांना दापोडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून मॅग्झीनसह पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई शनिवारी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलीस शिपाई नितीन सुरेश संकुनहट्टे (वय २७) यांनी शनिवारी (दि. ९ मे) रोजीफि दापोडी पोलीस ठाण्यात र्याद दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन अल्पवयीन बालकांना येरवडा येथील बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मे रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास दापोडीतील काटे लॉन्स जवळील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचा भंग करून आरोपींनी ६० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तुल आणि दोन राऊंड बाळगले होते. त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नव्हता. पोलीस उपनिरीक्षक देशमुख या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
