pimpri chinchwad-चिखली पेटली! ‘कृत्रिम’ पाणीटंचाईविरोधात जनतेचा एल्गार

चिखली (pimpri chinchwad), चिखली पेटली! ‘कृत्रिम’ पाणीटंचाईविरोधात जनतेचा एल्गार; लोकप्रतिनिधींना थेट रस्त्यावरच घेरणार
टँकर माफियांचा खेळ उघड करा; “पाणी नाही तर मतदान नाही”चा इशारा

चिखलीतील पाणी प्रश्नाने आता स्फोटक वळण घेतले आहे. अनेक दिवसांपासून नळ कोरडे पडले आहेत. नागरिकांचे संयमाचे बांध फुटले आहेत. ही टंचाई नैसर्गिक नसून जाणीवपूर्वक निर्माण केल्याचा गंभीर आरोप होत आहे. टँकर माफियांच्या फायद्यासाठी सामान्य नागरिकांना तहानले ठेवले जात असल्याची चर्चा जोरात आहे.

परिसरात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. टँकरसाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत. तरीही पुरेसे पाणी मिळत नाही. प्रशासन मात्र “तांत्रिक कारणे” सांगत वेळ काढत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
आता चिखलीकरांनी थेट संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे. फेडरेशनच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन उभारले जाणार आहे. नगरसेवक, आमदार, खासदार आणि आयुक्त यांना थेट रस्त्यावर रोखून जाब विचारला जाणार आहे. “मत मागायला येतात, पण पाणी द्यायला नाही,” अशी संतप्त भावना व्यक्त होत आहे.

“आम्ही कर भरतो, बिल भरतो. तरीही पाणी नाही. हा अन्याय सहन करणार नाही. आता घरात बसणार नाही. रस्त्यावर उतरून हक्क मिळवणार,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
नागरिकांनी स्पष्ट मागण्या मांडल्या आहेत.

कृत्रिम टंचाईची सखोल चौकशी व्हावी. टँकर लॉबी आणि अधिकाऱ्यांतील साटेलोटे उघड करावे. लोकसंख्येनुसार नियमित पाणीपुरवठा सुरू करावा. दोषींवर तातडीने कारवाई करावी.
जर तातडीने उपाययोजना झाल्या नाहीत, तर संपूर्ण चिखली ठप्प करण्याचा इशारा देण्यात आला आहे. “पाणी नाही तर मतदान नाही,” असा नारा देत आंदोलन तीव्र करण्याची तयारी सुरू झाली आहे. आता प्रशासन काय पावले उचलते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *