पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – खालुंब्रे येथील एका इमारतीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ‘अंदर-बाहेर’ जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट चारने छापा टाकला. यावेळी जुगार खेळत असलेल्या आठ जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) रोजी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.
भीमाशंकर रमनय्या भंडारी (वय ४६), शुभम संजय काडीवाले (वय २७), अमोल फकीरबा थोबाळे (वय ३८), धीरेद्र मिठाईलाल प्रजापती (वय ३६), रवी गोवर्धन सातोळे (वय २७), संतोष लक्ष्मीकांत गंजेवार (वय ४९), ज्योतीनाथ ज्ञानेश्वर नजन (वय ४४) आणि नितीन किसन कड (वय ३९) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट चारमधील पोलीस अंमलदार अमोल श्रीकांत वेताळ (वय ३५) यांनी शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) रोजी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ एप्रिल रोजी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास खालुंब्रे येथील कुकडूककू चिकन सेंटरसमोरील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हे आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी जुगार खेळत आणि खेळवत असताना मिळून आले. त्यांच्याकडून १३ हजार रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या घटनेचा तपास दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यातील नाईक बांगर करीत आहेत.
खालुंब्रेतील ‘अंदर-बाहेर’ जुगारावर छापा; ८ जणांवर कारवाई
