हॉर्न वाजवल्याच्या कारणावरूनअल्पवयीन मुलास बेदम मारहाण
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – चाकण येथे स्कुटीचा हॉर्न वाजवल्याचा राग धरून १६ वर्षीय मुलास लाथाबुक्यांनी व कड्याने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना २५ जुलै रोजी सायंकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास घडली.
वैभव दिनकर भांगरे (वय २५, रा. चाकण, मुळ रा. संगमनेर) व त्याचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन लक्ष्मण येरकर (वय २३, रा. नाणेकरवाडी, खेड) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ सचिन येरकर, (वय १६) याने पुढे गाड्या थांबल्याने स्कुटीचा हॉर्न वाजवला. यावर चिडून आरोपींनी त्याला डोक्यात, मानेवर मारहाण करून जखमी केले. चाकण दक्षिण पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.