*वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरांचे मोठे वैद्यकीय यश; महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार, रुग्णाला नवे जीवन
पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाने (वायसीएम) आणखी एका दुर्मिळ आणि अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तब्बल पाच तास चाललेल्या शस्त्रक्रियेद्वारे ६० वर्षीय महिलेच्या पोटातील तब्बल २०.१ किलो वजनाची महाकाय कर्करोगसदृश गाठ यशस्वीरीत्या काढण्यात आली. आर्थिक अडचणींमुळे उपचार रखडलेल्या या महिलेवर महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात आले.
सहा महिन्यांपूर्वी महिलेच्या पोटात छोटी गाठ जाणवू लागली होती. खासगी रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेसाठी सुमारे पाच लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आल्याने उपचार पुढे ढकलावे लागले. परिणामी ही गाठ वाढत जाऊन ५० x ३० x २० सेंटीमीटर एवढ्या प्रचंड आकाराची झाली. त्यामुळे चालणे, बसणे आणि जेवण करणेही महिलेसाठी अत्यंत कठीण झाले होते. अखेर त्यांनी वायसीएम रुग्णालयातील सर्जरी विभागप्रमुख डॉ. संतोष थोरात यांच्याकडे धाव घेतली. रुग्णाची गंभीर अवस्था पाहून तातडीने दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.
शस्त्रक्रियेपूर्वी रुग्ण अत्यंत अशक्त असल्याने डॉक्टरांनी विशेष वैद्यकीय नियोजन केले. रक्तातील घटक, प्रथिने आणि पोषणतत्त्वांची कमतरता भरून काढण्यासाठी विशेष उपचार करण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांची उच्च-जोखीम संमती घेऊन पाच तासांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. गाठीचे संपूर्ण उच्चाटन करत आवश्यक लिम्फ नोड डिसेक्शनही करण्यात आले.
शस्त्रक्रियेनंतरच्या हिस्टोपॅथॉलॉजी तपासणीत ही गाठ ‘बायलेटरल म्युसिनस सिस्टॅडेनोकार्सिनोमा’ या अत्यंत दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगाची असल्याचे स्पष्ट झाले. एवढ्या मोठ्या आकाराची गाठ कोणतीही ठळक लक्षणे न दिसता वाढणे हे वैद्यकीय क्षेत्रातील मोठे आव्हान असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला दोन दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून आता त्या स्वतः चालत-फिरत आहेत आणि नियमित आहारही घेत आहेत.
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले की, पदव्युत्तर (पीजी) संस्थेमुळे वायसीएममध्ये आता अतिगुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही यशस्वीपणे करता येत आहेत. ही शस्त्रक्रिया अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी व विभागप्रमुख डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्या प्रशासकीय मार्गदर्शनाखाली अनुभवी डॉक्टर, भूलतज्ज्ञ, पॅथॉलॉजिस्ट आणि परिचारिका यांच्या समन्वयातून यशस्वी झाली.
