भारतीय संगीतविश्वातील ज्येष्ठ आणि लोकप्रिय पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संगीतविश्वावर शोककळा पसरली असून विविध क्षेत्रांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही सुमन कल्याणपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, “ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वातील एक मधुर, सुरेल आणि भावस्पर्शी स्वर आज कायमचा शांत झाला. सहा दशकांहून अधिक काळ आपल्या अद्वितीय गायनाने त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मराठी, हिंदी, बंगाली, ओडिया अशा विविध भाषांतील त्यांच्या अजरामर सुरावटी ही संगीतविश्वाची अमूल्य ठेव आहे.
‘पद्मभूषण’ सन्मानाने गौरविलेल्या सुमनजींनी आपल्या जादुई स्वरांनी भारतीय संगीत समृद्ध केले. त्यांच्या गाण्यांतील माधुर्य आणि भावस्पर्शी अभिव्यक्ती सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने संगीतविश्वाची मोठी हानी झाली आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सुमन कल्याणपूर यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गाऊन संगीतप्रेमींच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एक सुवर्ण अध्याय संपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या सुरेल आवाजाच्या आठवणी आणि अजरामर गीते कायम रसिकांच्या स्मरणात राहतील.
