देहूरोडमध्ये एकावर फरशीने हल्ला; चौघांवर गुन्‍हा दाखल

पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – जुन्या वादातून फरशी फेकून मारत हल्ला करण्यात आला. ही घटना देहूरोड येथील नखाते कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी (दि. २५ मे) रोजी मध्‍यरात्री एक वाजताच्‍या सुमारास घडली.
आदित्य डोलारे (वय २०, रा. एमबी कॅम्प, देहूरोड) आणि त्याच्या तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ जगन्नाथ मोरे (वय ४५, रा. देहूगाव, ता. हवेली) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ मोरे हे नखाते कॉम्प्लेक्स येथे कर्तव्‍यावर असताना आरोपी डोलारे तिथे आला. त्‍याला काही दिवसांपूर्वी रूम रिकामी करण्यास सांगतल्‍याच्‍या कारणावरून आरोपींनी मोरे यांच्याशी वाद घालत त्यांच्या दिशेने फरशी फेकली. ही फरशी त्यांच्या कपाळावर आणि छातीवर लागली. यात ते जखमी झाले. तपास देहूरोड पोलीस ठाण्यातील हवालदार माने करीत आहेत.