पिंपरी-चिंचवड :
शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असतानाच दाखल्यांच्या नव्या पोर्टलमुळे पालक आणि विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. शासनाने सुरू केलेली नवीन ऑनलाइन प्रणाली सध्या अत्यंत संथ गतीने चालत आहे. त्यामुळे उत्पन्न, अधिवास, जातीचे दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील महा ई-सेवा केंद्रांवर रोजच गर्दीचे चित्र दिसत आहे.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालक व्यक्त करत आहेत. अनेक ठिकाणी सर्व्हर सतत बंद पडत असल्याने अर्ज प्रक्रिया रखडली आहे. नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
महा ई-सेवा केंद्र चालकांनी दिलेले माहितीनुसार, नवीन पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करताना गंभीर अडचणी येत आहेत. अधिवास दाखल्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे प्रणाली स्वीकारत नाही. सध्या फक्त ओळखपत्र, लाइट बिल आणि रेशन कार्ड अपलोड होत आहे. इतर कागदपत्रे अपलोड न झाल्याने अर्ज अपूर्ण राहत आहेत.
नवीन प्रणालीमुळे केंद्र चालकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रत्येक कागदपत्र ‘मर्ज’ करून ५०० केबीच्या फाईलमध्ये मर्यादेत तयार करावे लागत आहे. त्यासाठी अतिरिक्त वेळ खर्च होत आहे. परिणामी एका अर्जासाठी पूर्वीपेक्षा अधिक वेळ लागत असून केंद्रांवरील कामाचा ताण वाढला आहे.
दरम्यान, सर्व्हरच्या समस्येमुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना वारंवार केंद्रांवर जावे लागत आहे. अनेक ठिकाणी वादावादीचे प्रकारही घडत आहेत. “प्रवेशाच्या महत्त्वाच्या काळातच नवीन प्रयोग का करण्यात आला?” असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
जुन्या वेबसाइटवरील सेवा संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांसमोर दुसरा पर्याय उरलेला नाही. नवीन पोर्टल सुरळीत सुरू होण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात, अशी माहिती संबंधित यंत्रणेकडून दिली जात आहे. तोपर्यंत प्रशासनाने तात्पुरती पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
