केबल टाकताना जलवाहिनी फुटली; संतप्त नागरिकांचे खड्ड्यात उतरून आंदोलन, प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी
पिंपरी–चिंचवड : महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका निगडीतील यमुनानगर परिसरातील नागरिकांना बसला असून गेल्या तीन दिवसांपासून परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नवीन विद्युत केबल टाकण्याच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. मात्र, तीन दिवस उलटूनही दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री महावितरणकडून नवीन भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी खोदकाम करताना पाणीपुरवठा विभागाची मुख्य जलवाहिनी फुटली. घटनेनंतर मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहून गेले. त्यामुळे परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
विशेष म्हणजे, जलवाहिनी फुटल्यानंतर तातडीने दुरुस्ती होणे अपेक्षित असताना संबंधित विभागांकडून वेळकाढूपणा करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिणामी नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आणि सामाजिक कार्यकर्ते बाबा परब यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी आंदोलन करण्यात आले.
या वेळी संतप्त नागरिकांनी थेट खोदलेल्या खड्ड्यात उतरून निषेध नोंदवला. “पाणी नाही, पण आश्वासनांचीच बरसात” अशा शब्दांत नागरिकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. लाखो लिटर पाणी वाया जात असताना संबंधित विभाग मात्र एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.
यमुनानगरसारख्या दाट लोकवस्तीच्या भागात सलग तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणे ही गंभीर बाब असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. तातडीने जलवाहिनी दुरुस्त करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच या निष्काळजीपणाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही सामाजिक कार्यकर्ते बाबा परब यांनी दिला.
