पुण्यातील अवैध दारू प्रकरणावरून करुणा मुंडे यांचा सरकारवर घणाघात

पुण्यातील अवैध दारू विक्री प्रकरणात झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य शक्ती सेनेच्या नेत्या करुणा धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गंभीर घटना घडल्यानंतर केवळ कठोर कारवाईची आश्वासने देऊन सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप त्यांनी केला.

करुणा मुंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात मुख्यमंत्री आणि गृहमंत्रालयाला थेट लक्ष्य करत, राज्यातील अवैध दारू विक्री, ड्रग्ज, चरस, गांजा आणि अफूच्या वाढत्या अवैध व्यापाराबाबत प्रश्न उपस्थित केले. “प्रत्येक गंभीर घटनेनंतर माध्यमांसमोर येऊन कठोर कारवाईचे आश्वासन दिले जाते. मात्र प्रत्यक्षात ड्रग्ज माफिया, दारू माफिया आणि इतर गुन्हेगारी टोळ्यांवर प्रभावी कारवाई का होत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी काही माफिया प्रवृत्तीच्या व्यक्तींना राजकीय पक्षांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप करत, अशा व्यक्तींवर थेट कारवाई करण्याची मागणी केली. “सरकार केवळ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करून आपली जबाबदारी झटकत आहे. मात्र समाजविघातक कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या मुख्य सूत्रधारांना वाचवले जात आहे,” असेही त्या म्हणाल्या.

राजकीय स्वार्थासाठी पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संरक्षण देण्याची प्रवृत्ती थांबवून राज्यातील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकारने ठोस भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या कार्यशैलीचा आदर्श घेऊन सध्याच्या नेतृत्वाने कठोर आणि निष्पक्ष प्रशासन द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

पुण्यातील अवैध दारू प्रकरणानंतर करुणा मुंडे यांनी केलेल्या या टीकेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था, अवैध धंदे आणि त्यांना मिळणारे कथित राजकीय संरक्षण हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *