वारकऱ्यांच्या सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेची केली तपासणी; संबंधित यंत्रणांना तत्काळ कामे पूर्ण करण्याच्या सूचना
पुणे –
आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित, सुकर आणि सुविधायुक्त व्हावा यासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी गुरुवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी विविध ठिकाणांवरील सुविधा आणि कामांचा आढावा घेण्यात आला.
पालखी मार्गावरील रस्त्यांची स्थिती, स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, आरोग्य सुविधा, वाहतूक नियोजन तसेच वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. आवश्यक ठिकाणी सुधारणा करण्याच्या सूचना देत सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा महत्त्वाचा सोहळा आहे. लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होत असल्याने प्रत्येक घटकाचे नियोजन काटेकोरपणे करण्यावर प्रशासनाचा भर आहे. याच पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी प्रत्यक्ष पालखी मार्गावर जाऊन विविध कामांची पाहणी केली.
या दौऱ्यात जिल्हाधिकारी गजानन पाटील, उपायुक्त तुषार ठोंबरे, संबंधित उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती तेली-उगले यांनी आळंदी, देहू, हडपसर, सासवड, जेजुरी, वाल्हे आणि निरा परिसरातील पालखी मार्गाची पाहणी केली. वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळांवरील सुविधा, रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता मोहीम आणि वाहतूक व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर त्या सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गाच्या पाहणीसाठी रवाना झाल्या.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश दिले असून, वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
वारीसाठी प्रशासन सज्ज
वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसह स्वच्छता, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर देण्यात येत आहे. यंदाची वारी अधिक शिस्तबद्ध आणि सुविधायुक्त करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर तयारी करत असल्याचे या पाहणीतून स्पष्ट झाले.
