mumbai-५ लाख मुंबईकर घेणार व्यसनमुक्तीची शपथ

(mumbai)-मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालक मंत्री तथा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारातून “अमली पदार्थमुक्त मुंबई” ही व्यापक मोहीम राबविण्यात येत असून, मुंबई शहर व उपनगरांमध्ये ती मोठ्या प्रमाणावर अंमलात आणली जाणार आहे. येत्या २५ जून २०२६ रोजी या मोहिमेचे उद्घाटन मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते होणार असून, त्याच दिवशी ५ लाखांहून अधिक मुंबईकर तब्बल ५००० ठिकाणी एकत्र येऊन व्यसनमुक्तीची शपथ घेणार आहेत.

महाराष्ट्र दिनानिमित्त या मोहिमेची घोषणा करण्यात आली होती. शाळा, महाविद्यालये, रहिवासी संकुले, हौसिंग सोसायट्या तसेच विविध सामाजिक व धार्मिक संस्था या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत.

या मोहिमेच्या तयारीसंदर्भात मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. सौरभ कटियारजी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.

यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “व्यसनमुक्त मुंबई घडवणे हे सरकार, शासन, समाजाच्या सक्रिय सहभागातूनच हे शक्य होणार आहे. आपल्या पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहे. ही एक लोकचळवळ आहे आणि यातून निश्चितच सकारात्मक परिवर्तन घडेल.”

या उपक्रमामुळे युवकांमध्ये जनजागृती वाढून अमली पदार्थांविरोधात मजबूत सामाजिक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *