पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – फुगेवाडीतील विषारी दारू प्रकरणाने नऊ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील कर्ती माणसे गेल्याने अनेक संसार उघड्यावर पडले. मात्र, या कुटुंबांच्या वेदना मृत्यूनंतरही संपल्या नाहीत. आपल्या प्रिय व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या नातेवाईकांना स्मशानभूमीचा रस्ता बंद असल्याने मृतदेह अक्षरशः लोखंडी पत्र्यांवरून उचलून न्यावे लागले. हा हृदयद्रावक प्रकार पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
फुगेवाडीतील स्थानिक स्मशानभूमी ही फुगेवाडी पुणे महापालिकेत असताना बांधण्यात आली आहे. अनेक दशकांपासून परिसरातील नागरिकांसाठी एकमेव आधार आहे. मात्र, रेल्वे रुळालगत उभारण्यात आलेल्या लोखंडी संरक्षण पत्रे लावल्यामुळे स्मशानभूमीकडे जाणारा पारंपरिक मार्ग बंद झाला आहे. नागरिकांच्या मागणीनंतर केवळ एक व्यक्ती जाऊ शकेल एवढी अरुंद फट ठेवण्यात आली. परंतु अंत्ययात्रा किंवा तिरडी नेण्यासाठी हा मार्ग पूर्णपणे निरुपयोगी ठरत आहे.
गेल्या तीन दिवसांत एकामागून एक नऊ मृत्यू झाल्यानंतर ही समस्या भीषण स्वरूपात समोर आली. दुःखाने खचलेल्या कुटुंबीयांना मृतदेह घेऊन स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी अक्षरशः संघर्ष करावा लागला. काही ठिकाणी नागरिकांनी मृतदेह खांद्यावर घेत उंच लोखंडी पत्र्यांवरून काळजीपूर्वक पलीकडे नेले. आपल्या जिवाभावाच्या माणसाला अखेरचा निरोप देतानाही अशी परवड व्हावी, यामुळे अनेकांच्या भावना अनावर झाल्या.
“आमच्या भागात जगतानाच सुविधा नाहीत. रस्ते नाहीत, मूलभूत सोयी नाहीत. आता मरण आलं तरी सन्मानाने निरोप देता येत नाही,” अशी व्यथा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. दापोडी उड्डाणपुलाखालून जाणारा पर्यायी मार्ग उपलब्ध असला तरी तो अत्यंत लांबचा असल्याने अंत्ययात्रेसाठी तो व्यवहार्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या वेदना अजून ताज्या असतानाच स्मशानभूमीच्या मार्गाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मृत्यूच्या दुःखातही अंत्यसंस्कारासाठी संघर्ष करावा लागणाऱ्या फुगेवाडीकरांची ही शोकांतिका प्रशासनाला जाग आणणारी ठरेल का, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
“जगणं कठीण झालंय हे मान्य केलं, पण मरणही इतकं अवघड होईल असं वाटलं नव्हतं,” या एका वाक्यात आज संपूर्ण फुगेवाडीची वेदना सामावली आहे.
फुगेवाडी ः स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता रेल्वे विभागाने पत्रे लावून बंद केला आहे.
