शाळेची घंटा वाजली, पण खर्चाचा आकडा वाढला!; वह्या-पुस्तकांसह शालेय साहित्य महागले जीएसटी वाढ, कच्च्या मालाचे चढे दर आणि वाहतूक खर्चाचा परिणाम; पिंपरी-चिंचवडमध्ये पालकांचे बजेट कोलमडले

पिंपरी-चिंचवड :
नवीन शैक्षणिक वर्षाची चाहूल लागताच शहरातील बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. काही शाळा सुरू झाले आहेत तर काही शाळा सुरू होण्याची लगबग वाढली आहे. पालकांची खरेदीसाठी धावपळ सुरू झाली आहे. मात्र, यंदा शालेय साहित्याच्या वाढलेल्या किमतींमुळे पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. वह्या, पुस्तके, स्कूल बॅग, रेनकोट, कंपासपेटी आणि पाण्याच्या बाटल्यांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे शिक्षणाचा खर्च पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, भोसरी आणि चिखली परिसरातील पुस्तकांच्या दुकानांमध्ये सध्या मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची लगबग वाढली आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अनेक वस्तू महाग झाल्याने पालकांचे आर्थिक गणित बिघडत आहे.

व्यावसायिकांच्या मते, वह्या आणि पुस्तकांच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल महागला आहे. कागद निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्याचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर झाला आहे. तयार वह्यांवरही कर आकारला जात असल्याने खर्च वाढला आहे. परिणामी अनेक कंपन्यांनी वह्यांच्या किमती वाढवल्या आहेत.

कागदाच्या वाढत्या दरामुळे सामान्य नोटबुकच्या किमतीत २० ते ३० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मोठ्या आकाराच्या वह्या आणि विशेष प्रकारच्या नोटबुकचे दर आणखी वाढले आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यामागील खर्च वाढत असल्याचे चित्र आहे.

फक्त वह्याच नव्हे तर इतर शालेय साहित्याच्याही किमती वाढल्या आहेत. स्कूल बॅग, रेनकोट, कंपासपेटी, वॉटर बॉटल आणि वॉटर बॅग यांचे दर वाढले आहेत. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चही वाढला आहे. त्याचाही परिणाम बाजारभावावर झाला आहे. एकूण शालेय साहित्याच्या किमतीत सुमारे १० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे व्यापारी सांगतात.

काही कंपन्यांनी थेट भाववाढ केलेली नाही. मात्र, किरकोळ विक्रेत्यांना दिली जाणारी सवलत कमी केली आहे. त्यामुळे ग्राहकांना पूर्वीप्रमाणे सवलती मिळत नाहीत. अनेक ठिकाणी साहित्य छापील किमतीलाच विकले जात आहे. परिणामी, वाढीव खर्चाचा भार थेट पालकांवर पडत आहे.
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच वाढलेल्या खर्चामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांची चिंता वाढली आहे. मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक साहित्य खरेदी करताना पालकांना अधिक पैसे खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे महागाईचा फटका यंदा शिक्षण क्षेत्रालाही बसल्याचे दिसून येत आहे.

“पाठ्यपुस्तकांच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही. मात्र, वह्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. कागदावरील जीएसटी वाढ आणि कच्च्या मालाचे वाढते दर यामुळे नोटबुकच्या किमती २० ते ३० रुपयांनी वाढल्या आहेत. त्याचा थेट परिणाम पालकांच्या खर्चावर होत आहे,” असे
– पिंपरीतील पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले.
तर “अनेक कंपन्यांनी थेट भाववाढ केलेली नाही. मात्र, किरकोळ विक्रेत्यांना दिल्या जाणाऱ्या सवलती कमी केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना वाढीव खर्चाचा सामना करावा लागत आहे. आगामी काळात परिस्थिती सुधारल्यास शालेय साहित्याच्या किमती स्थिर होण्याची शक्यता आहे.” अशी माहिती आकुर्डीतील पुस्तक विक्रेत्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *