मान्सूनची प्रतीक्षा आणखी लांबणार! राज्यात १० जूनपर्यंत मान्सूनची चिन्हे नाहीत

१ जूनपासून वादळी पावसाचा इशारा
शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला; वादळी पावसाला मान्सून समजून पेरणीची घाई टाळा

मुंबई :
राज्यातील नागरिक आणि शेतकरी मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असताना हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागात किमान १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पडणाऱ्या वादळी पावसाला मान्सून समजण्याची चूक करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

१ जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात राज्याच्या हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशातील अनेक भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडू शकतो. कोकणातील काही भागांनाही पावसाचा फटका बसण्याचा अंदाज आहे. या बदलामुळे मे महिन्यातील तीव्र उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार असला तरी पूर्व विदर्भातील काही भागांत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वरच राहण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचे म्हणजे, आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी कोणताही संबंध नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. अद्याप मान्सून केरळातही पोहोचलेला नसल्याने राज्यात त्याच्या आगमनासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान, कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांनी शेतकऱ्यांना विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे. केवळ वादळी पावसाच्या आधारावर पेरणीची घाई करू नये, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच विजांच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. झाडाखाली, टिनशेडखाली, विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब किंवा विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे. पाळीव जनावरांचीही सुरक्षित व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मान्सूनची प्रतीक्षा अजून काही दिवस कायम राहणार असली तरी पुढील आठवड्यातील बदलते हवामान आणि वादळी पावसामुळे राज्यातील वातावरणात काहीसा गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *