(pimpri chinchwad)-आनंदाच्या क्षणांवर काळाचा घाला; मित्राच्या बहिणीच्या लग्नासाठी आलेला ‘यश’ भामा आसखेडच्या पाण्यात बुडाला
पोहायला येत नसतानाही पाच मित्र पाण्यात उतरले; मुंबईच्या १६ वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी अंत
मावळ – मित्राच्या बहिणीच्या लग्नासाठी मुंबईहून मोठ्या उत्साहाने आलेल्या एका १६ वर्षीय तरुणाचा भामा आसखेड धरणाच्या जलाशयात बुडून अंत झाला. आनंदाने न्हाऊन निघालेल्या लग्नाच्या घरात या घटनेमुळे शोककळा पसरली असून, निसर्गाच्या सानिध्यात मौजमजा करण्याचे रूपांतर एका न विसरता येणाऱ्या दुःखात झाले आहे.
लग्नकार्यासाठी आला होता पराळे गावात
यश जाधव (वय १६, रा. मुंबई) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. यशच्या मित्राच्या बहिणीचे खेड तालुक्यातील पराळे गावाजवळ विठ्ठलवाडी येथे आज, मंगळवारी लग्न होते. या विवाह सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी यश आणि त्याचे पाच मित्र खास मुंबईहून आले होते. लग्नाचा मुहूर्त काही तासांवर असताना, सकाळी हे पाचही मित्र गावाजवळील भामा आसखेड धरणाचा परिसर पाहण्यासाठी गेले.
पाण्याचा अंदाज चुकला आणि घात झाला
धरणातील निळेशार पाणी पाहून या पाचही मित्रांना पोहण्याचा मोह आवरला नाही. विशेष म्हणजे, या पाचही जणांपैकी कोणालाही पोहता येत नव्हते. तरीही पाण्याचा अंदाज न घेता ते जलाशयात उतरले. पात्रातील खोली लक्षात न आल्याने यश अचानक गटांगळ्या खाऊ लागला. आपल्याला पोहता येत नसल्याच्या हतबलतेमुळे त्याचे मित्रही त्याला वाचवू शकले नाहीत. डोळ्यादेखत आपला मित्र पाण्यात गडप होताना पाहून या मुलांच्या काळजाचा थरकाप उडाला.
रेस्क्यू टीमने बाहेर काढला मृतदेह
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला पाचारण केले. निलेश गराडे, विनय सावंत, कुंदन भोसले, अभिषेक मराठे आणि अनिश गराडे यांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून यशचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. ज्या घरात लग्नाच्या मंगलाष्टकांचे सूर घुमणार होते, तिथे आता यशच्या निधनामुळे फक्त हुंदके ऐकू येत आहेत.
पोस्टमार्टम नंतर यशचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, या घटनेने परिसरात आणि मुंबईतील त्याच्या मित्रपरिवारात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
