दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावर राजधानी एक्स्प्रेसला भीषण आग
तिरुवनंतपुरम येथून नवी दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या १२४३१ ‘राजधानी एक्स्प्रेस’ला आज रविवार (१७ मे) पहाटेच्या सुमारास मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात भीषण आग लागली. या आगीत गाडीचा ‘थर्ड एसी’ (B-1) कोच पूर्णपणे जळून खाक झाला असून लगतच्या लगेज-कम-गार्ड डब्याचेही (SLR) मोठे नुकसान झाले आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांची तत्परता आणि गाडीतील स्वयंचलित सुरक्षा यंत्रणेमुळे केवळ १५ मिनिटांत ६८ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र व्यस्त असलेल्या दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
