१८ मृत्यूंनी हादरले राज्य; अवैध दारू रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
पिंपरी, दि. 30 (प्रतिनिधी)
फुगेवाडी-दापोडी विषारी दारूकांडातील १८ जणांच्या मृत्यूनंतर राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे. स्थानिक तपासात समोर आलेले धक्कादायक खुलासे, जिल्ह्याच्या सीमा ओलांडणारे पुरवठा जाळे आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे अवैध दारू व्यवसायाशी संबंधित घटकांमध्ये खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांच्या तपासातून उरळी कांचन, फुगेवाडी, खडकी, वडारवाडी, हडपसर आणि परिसरातील अनेक ठिकाणांचा संबंध समोर आला होता. दारूमध्ये ऑनलाइन मागविलेले घातक रासायनिक पदार्थ मिसळून त्याची विक्री करण्यात आल्याचा संशय तपासातून व्यक्त करण्यात आला आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अवघ्या काही हजार रुपयांच्या फायद्यासाठी अनेकांच्या जीवाशी खेळ करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी, पुरवठादार, वितरक आणि विक्रेते यांची साखळी मोठी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती केवळ एका परिसरापुरती मर्यादित नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सीआयडीकडे तपास गेल्यानंतर आता संपूर्ण नेटवर्कची नव्याने छाननी केली जाणार आहे. घातक मिथेनॉलचा पुरवठा कोठून झाला, त्यामागे कोणते आर्थिक हितसंबंध होते, तसेच अवैध दारूचे जाळे नेमके किती मोठे आहे, याचा शोध घेतला जाणार आहे. तपासाचा केंद्रबिंदू केवळ स्थानिक आरोपी नसून या व्यवसायामागील मुख्य सूत्रधारांवरही राहणार असल्याचे समजते.
दरम्यान, या दोन्ही गुन्ह्यांच्या तपासाच्या डायऱ्या, जप्त कागदपत्रे आणि इतर पुरावे सीआयडीच्या विशेष पथकाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे अहवाल, रासायनिक विश्लेषण आणि आरोपींची सखोल चौकशी यांच्या आधारे पुढील तपासाची दिशा निश्चित होणार आहे.
फुगेवाडी-दापोडी प्रकरणाने राज्यातील अवैध दारू व्यवसायाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. सीआयडीच्या तपासातून या रॅकेटमागील आर्थिक साखळी, पुरवठा व्यवस्था आणि संभाव्य संरक्षण देणाऱ्या घटकांचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्याचे लक्ष सीआयडीच्या तपासाकडे लागले आहे
