विधानपरिषदेच्या १७ च्या १७ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील – सुनिल तटकरे

महायुतीच्या १७ अधिकृत उमेदवारांची यादी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली जाहीर…

मुंबई

विधानपरिषदेची ही निवडणूक महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय तिन्ही पक्षाच्यावतीने घेण्यात आला होता. त्यामुळे विधानपरिषदेच्या १७ च्या १७ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

महायुतीची पत्रकार परिषद आज गरवारे क्लब हाऊस मुंबई येथे पार पडली.

दिर्घ कालावधीच्या प्रतिक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या निवडणूक मतदार नसल्यामुळे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्याने या निवडणूका रखडल्या होत्या. त्यामुळे आता या निवडणूका होत आहेत असेही सुनिल तटकरे म्हणाले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगभरात भारताचे सामर्थ्य वाढत आहे. आपला देश विकसित राष्ट्र म्हणून वेगाने प्रगती करत आहे. अशावेळी एनडीए देशात आणि राज्यात प्रबळ असली पाहिजे. त्यामुळेच भाजपचे शिर्षस्थ नेते यादृष्टीने दखल घेत आहेत असेही सुनिल तटकरे म्हणाले.

महायुतीमध्ये चर्चा झाली असून जिथेजिथे महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अधिक लोक आले आहेत. त्याबाबतच्या स्पष्ट सूचना तिन्ही पक्षांचे नेत्यांनी दिल्या आहेत. या निवडणुकीत प्रथम क्रमांकाचे मत द्यायचे आहे. दुसऱ्या क्रमांकाचे मत द्यायला कुणाकडे संख्याबळ नाही. ४ तारखेला अर्ज मागे घेण्याची मुदत संपेल पण आजपासूनच अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उद्या तीन वाजता अर्ज मागे घेतले जातील त्यावेळी महायुतीचे उमेदवार विजयी झालेले पहायला मिळेल असेही सुनिल तटकरे म्हणाले.

विरोधकांना अनेक ठिकाणी उमेदवारच मिळाले नाहीत. काही ठिकाणी शोधून उमेदवार उभे करण्यात आले आहेत. आम्हाला आनंद आहे शेवटी लोकशाहीमध्ये निवडणूक झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचा मुलभूत अधिकार आपल्याला दिला आहे. त्यामुळे निवडणूका होतील परंतु आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व असे यश मिळेल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

विधानपरिषद निवडणुकीतील महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी आज जाहीर करावी म्हणून आज पत्रकार परिषद घेण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली.

बंडखोर म्हणून ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांनी अर्ज मागे घ्यावेत. त्यांचा पक्ष नक्कीच विचार करेल असे सांगतानाच यावेळी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी रविंद्र चव्हाण यांनी जाहीर केली.

१७ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा दावा शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी यावेळी केला.

या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, शिवसेना नेते राहुल शेवाळे, भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *