राज्य परिवहन मंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनी,स्वच्छ एसटी, हरित एसटी, आणि बचत करणारी सक्षम एसटी घडवण्याचा निर्धार करण्याचे परिवहन मंत्री तथा राज्य मार्गपरिवहन मंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांचे आवाहन
महाराष्ट्राच्या जनमानसाशी अतूट नाळ जुळलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (#एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण एसटी परिवाराने ‘स्वच्छ एसटी, हरित एसटी आणि बचत करणारी सक्षम एसटी’ घडविण्याचा निर्धार करावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयेाजित कार्यक्रमात केले.
‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद अंगीकारून एसटीने गेली ७८ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अखंड सेवा पोहोचवली आहे. डोंगर-दऱ्या, दुर्गम आदिवासी भाग, ग्रामीण क्षेत्रे, शहर आणि महानगरांना जोडणारी लालपरी ही केवळ वाहतुकीचे साधन नसून महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाची जीवनवाहिनी बनली आहे, असेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
प्रत्येक आगाराने दररोज किमान पाच लिटर डिझेल बचत करण्याचा संकल्प केला आहे. छोट्या-छोट्या बचतीतून मोठी आर्थिक उभारणी शक्य होते. इंधन बचतीमुळे महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याबरोबरच प्रदूषण नियंत्रणालाही मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करून ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.