पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील युवा खेळाडूंनी जिल्हास्तरीय एथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करत शहराच्या क्रीडा परंपरेला नवे यश मिळवून दिले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे झालेल्या स्पर्धेत साई स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी विविध प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकांची कमाई केली. या खेळाडूंचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी नगरसदस्य सुरेश भोईर, सदाशिव खाडे आणि प्रशिक्षक चंद्रशेखर कुदळे उपस्थित होते. मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेत मधुरा खांबे हिने लांब उडी आणि तिहेरी उडी या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदके पटकावत आपली छाप पाडली. समृद्धी भोईर हिने हेप्टॅथलॉन स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्णपदक जिंकले. तर प्राची अंधारे हिने २० हजार मीटर रेस वॉकिंग स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. या तिन्ही खेळाडूंची आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या यशामुळे शहराच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खेळाडूंनी मिळविलेल्या यशामुळे शहराच्या क्रीडा क्षेत्राला नवी उभारी मिळाली असून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही पिंपरी-चिंचवडचे खेळाडू दमदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पिंपरी-चिंचवडमधील खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून त्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने क्रीडा क्षेत्रात पुढे यावे.
– रवि लांडगे, महापौर
