पुणे : संपूर्ण राज्य हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचार आणि खून प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रियेला आता वेग आला आहे. या संवेदनशील खटल्याची सुनावणी २१ मे २०२६ पासून विशेष न्यायालयात सुरू होणार असून, पुणे ग्रामीण पोलीसांनी अवघ्या १४ दिवसांत तब्बल ११०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करत तपासाला गती दिली आहे.
राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ मे रोजी घडलेल्या या निर्घृण घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. आरोपी भिमराव प्रभाकर कांबळे याने तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर नसरापूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपासी पथकाकडून करण्यात आला. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, रासायनिक विश्लेषण आणि इतर वैज्ञानिक तपासाच्या आधारे रात्रंदिवस काम करून १६ मे रोजी उशिरा दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
या खटल्यासाठी राज्य शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती केली आहे. त्यांना ३२ वर्षांचा न्यायालयीन अनुभव असून अनेक संवेदनशील खटल्यांमध्ये त्यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा खटला विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा न्यायाधीश तथा विशेष सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. खटल्याची सुनावणी ‘इन-कॅमेरा’ पद्धतीने आणि रोजच्या रोज घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सरकार पक्षाकडून सुनावणीच्या सुरुवातीलाच न्यायालयाने घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी विनंती केली जाणार आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी आणि पीडित कुटुंबाला जलद न्याय मिळावा, यासाठी तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया वेगाने राबवली जात असल्याचे सांगण्यात आले.
तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे अत्यंत भक्कम तपास करण्यात आला आहे. हा खटला विक्रमी वेळेत पूर्ण करून आरोपीला कठोर शासन मिळवून देणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे.
– अजय मिसर, विशेष सरकारी वकील
