मुंबई
राज्यातील वडापाव विक्रेत्यांवर आता अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) करडी नजर राहणार आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नसुरक्षेबाबत कठोर भूमिका घेत राज्यभरातील वडापाव विक्रेते, हातगाड्या आणि लघु खाद्यव्यावसायिकांची विशेष तपासणी करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे वडापाव व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एफडीएने वडापाव तयार करण्यासाठी वापरले जाणारे तेल, बटाट्याचा दर्जा, चटण्या, पाणी तसेच स्वच्छतेच्या नियमांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
तपासणीदरम्यान निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, वारंवार तेच तेल वापरणे, अन्नसुरक्षा परवाना नसणे किंवा अस्वच्छ परिस्थितीत अन्न तयार करणे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. गंभीर प्रकरणांमध्ये परवाना रद्द करणे किंवा आस्थापना बंद करण्याची कारवाईदेखील होऊ शकते.
तुकाराम मुंढे यांनी अन्नसुरक्षेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळणे हा त्यांचा अधिकार असून नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले
दरम्यान, एफडीएच्या या निर्णयानंतर अनेक वडापाव विक्रेत्यांनी आपल्या आस्थापनांमध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील लोकप्रिय स्ट्रीट फूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडापावच्या गुणवत्तेबाबत आता प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे या कारवाईतून स्पष्ट होत आहे.
