पवना, इंद्रायणी नदी खोऱ्यासह परिसरातील जलस्रोतांबाबत वाढली चिंता; नदीच्या आरोग्याचे प्रतीक असलेल्या दुर्मिळ प्राण्यापुढे संकट
वडगाव मावळ :
मावळ तालुका हा नद्या, धरणे, ओढे आणि समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखला जातो. मात्र वाढते प्रदूषण, नदीपात्रांवरील अतिक्रमणे आणि मानवी हस्तक्षेपामुळे जलपरिसंस्थेचा समतोल बिघडत आहे. या बदलांचा सर्वाधिक फटका पाणमांजर या दुर्मिळ आणि संवेदनशील जलचर प्राण्याला बसत असल्याची बाब पर्यावरणप्रेमींनी अधोरेखित केली आहे.
नदीतील पाण्याची गुणवत्ता आणि परिसंस्थेची स्थिती तपासण्यासाठी पाणमांजर हे महत्त्वाचे नैसर्गिक संकेतक मानले जाते. ज्या नदीत पाणमांजर आढळते, ती नदी तुलनेने निरोगी आणि जैवविविधतेने समृद्ध असल्याचे मानले जाते. त्यामुळे या प्राण्याचे अस्तित्व हे नदीच्या आरोग्याचे जिवंत प्रमाणपत्र मानले जाते.
नदीपात्रांवर वाढता ताण
मावळ परिसरातील नद्या आणि जलस्रोतांवर गेल्या काही वर्षांत मोठा ताण वाढला आहे. नागरी विस्तार, पर्यटनाची वाढ आणि वाढते प्रदूषण यामुळे अनेक ठिकाणी नदीकाठच्या नैसर्गिक अधिवासांवर परिणाम झाला आहे. नदीत मिसळणारे सांडपाणी आणि प्लास्टिक कचरा ही गंभीर समस्या बनली आहे.
या प्रदूषणाचा थेट परिणाम नदीतील जलचरांवर होत आहे. मासळीचे प्रमाण कमी होत असल्याने पाणमांजरांच्या खाद्यसाखळीवर परिणाम होत आहे. परिणामी त्यांचे जगणे अधिक कठीण बनत आहे.
अधिवास नष्ट होण्याचा धोका
पाणमांजरांना नदीकाठची दाट झाडी, शांत परिसर आणि सुरक्षित बिळे आवश्यक असतात. मात्र नदीकिनाऱ्यांवरील अतिक्रमणे आणि वृक्षतोड यामुळे त्यांची सुरक्षित आश्रयस्थाने कमी होत आहेत. प्रजननासाठी आवश्यक जागांचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्या संख्येवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
मानव आणि वन्यजीव संघर्ष वाढतोय
नदीकाठच्या भागात अनेकदा मच्छीमारांना पाणमांजरांचे दर्शन घडते. अन्नाच्या शोधात ही प्राणी मच्छीमारांच्या जाळ्यांमधील मासे पकडतात. काही वेळा जाळ्यांचे नुकसानही होते. त्यामुळे स्थानिक स्तरावर किरकोळ संघर्षाच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे.
पर्यावरण अभ्यासकांच्या मते, हा संघर्ष टाळण्यासाठी नदी परिसंस्था सक्षम ठेवणे गरजेचे आहे. नदीतील नैसर्गिक अन्नसाखळी टिकली तर अशा घटनांचे प्रमाणही कमी होऊ शकते.
मावळच्या नद्यांसाठी इशारा
मावळ तालुक्यातील पवना, इंद्रायणी नदीसह अनेक जलस्रोत जैवविविधतेसाठी महत्त्वाचे मानले जातात. या परिसरातील नद्या आणि ओढ्यांचे संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. नदी स्वच्छ राहिली तरच जलचर, पक्षी आणि इतर वन्यजीवांचे अस्तित्व टिकून राहणार आहे.
पर्यावरणप्रेमींची भूमिका स्पष्ट
पर्यावरण क्षेत्रातील जाणकारांच्या मते, केवळ वन्यजीव संरक्षणाच्या घोषणा करून चालणार नाही. नद्यांचे प्रदूषण रोखणे आवश्यक आहे. नदीकाठचे नैसर्गिक अधिवास जपले पाहिजेत. स्थानिक नागरिक, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.
पाणमांजरांचे अस्तित्व टिकले तरच नद्यांचे आरोग्य टिकेल. आणि नद्या जिवंत राहिल्या तरच मावळचा निसर्गही समृद्ध राहील. अशी भावना पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
